कन्नड/छञपतिसंभाजीनगर
तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित, (Kannad) कन्नडच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत आमदार संजना जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवशाही शेतकरी विकास पॅनल’ने सर्व जागा जिंकल्या.
या निवडणुकीत संजना जाधव (Sanjana Jadhav) यांच्या विरोधात तालुक्यातील विरोधकांनी एकजूट करत जोर लावला होता. माजी आमदार नितीन पाटील, नामदेव पवार, किशोर पाटील, उदयसिंग राजपूत, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, केतन काजे यांच्यासारख्या दिग्गजांनी एकाच मंचावर येऊन शिवशाही पॅनलला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांचे सगळे डाव उधळून लावत आमदार संजना जाधव यांच्या पॅनलने त्यांना धोबीपछाड दिला.

मतदारसंघातून पहिल्याच फटक्यात आमदार झालेल्या संजना जाधव यांनी आता मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्येही आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवायला सुरूवात केली आहे.
वडील माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, तीन टर्म आमदार असलेले बंधू संतोष दानवे यांच्याकडून प्रेरणा घेत संजना जाधव यांनी स्वतंत्रपणे नेतृत्व करत कन्नड खरेदी-विक्री संघांच्या निवडणुकीत बाजी मारली.

शिवशाही पॅनलने विरोधकांना क्लीन स्वीप देत सर्व पंधरा जागांवर दणदणीत विजय मिळवला. आमदार झाल्यानंतरच्या मतदारसंघातील पहिल्या निवडणुकीत त्यांनी चार माजी आमदारांचा डाव उधळून लावला.

हा विजय शेतकऱ्यांचा आहे, पुढील काळात शेतकरी हितासाठी ठोस पावले उचलू, असा शब्द संजना जाधव यांनी या विजयावर प्रतिक्रिया देताना दिला. पॅनलच्या विजयासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. मनोज राठोड, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद, उपसभापती जयेश बोरसे यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. त्यांनी पॅनलच्या मजबुतीसाठी गावोगावी जाऊन प्रचार केला.

सहकारी संस्थेच्या 106 म्हणजे शंभर टक्के मतदान झाले.
तर वैयक्तिक मतदारांपैकी 94 टक्के म्हणजे 582 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील या विजयाने संजना जाधव आणि शिवसेनेला तालुक्यात राजकीय बळ मिळाले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना आणखी ताकदीने पुढे जाणार असल्याचे सांगितले जात आहे. खरेदी विक्री संघातील विजयानंतर संपूर्ण संचालकांचा सत्कार भोकरदन येथे भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आला