ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. अंतरवाली सराटी येथे दोन दिवसांपासून ते उपोषण करत आहेत. हे गाव जालना जिल्ह्यात असून भाजप नेत्या पंकजा मुंडे पालकमंत्री आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पहिल्यांदाच जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी जरांगेंच्या भेटीवर मोठं विधान केले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांची भेट घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना मुंडे यांनीही भेटीची तयारी दाखवली. तसेच त्यांच्याविषयी आपल्या मनात सन्मान असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, जरांगे पाटील यांच्या उपोषणाविषयी मी अनेकदा बोलली आहे. ते त्यांचा लढा लढत आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात सन्मान आहे. संविधानाच्या चौकटीत बसून त्यांच्याच काय कुणाच्याही लढ्याला न्याय मिळावा, अशी माझी भूमिका आहे.

आज माझे जिल्ह्यात पहिले पाऊल आहे. त्यांच्याशी चर्चा करून जर त्यांनी सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. कारण शेवटी जेव्हा आपण कुणाच्या उपोषणाला, आंदोलनाला भेट देतो, तेव्हा तिथले वातावरण कसे असावं, ही जबाबदारी त्यांची असते. ती जबाबदारी त्यांनी घेतली तर मी नक्कीच सकारात्मकता दाखवायला तयार आहे. तसा निरोपही मी त्यांना पाठवीन आणि त्यांच्या निरोपाची प्रतिक्षा करीन, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रविवारी जरांगे यांच्या आंदोलनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी तिथे आमचे तहसीलदार काल गेले होते. जरांगे पाटील यांचे निवेदन घेऊन त्यांनी सरकारकडे पाठवलं आहे. दोन दिवस सुट्टी असल्याने आता उद्या त्यांच्या काय मागण्या आहेत, हे पाहून जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न आम्ही करू, असे अजितदादांनी स्पष्ट केले.