वैजापूर/छञपतीसंभाजीनगर
एकात्मिक बाल विकास विभागात सुरू असलेल्या मदतनिसांच्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहाराच्या संशयाचा खडा.
आमदार रमेश बोरनारे यांच्या निकटवर्तीयांनी या प्रकरणाचा भंडाफोड केल्याने गैरव्यवहार चव्हाट्यावर
एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या १२२ मदतनीसांच्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहाराच्या संशयाने वैजापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. अंगणवाडी सेविका व्हायचे असेल तर दीड लाख रुपये जमा करा, अशा कॉल्समुळे संपूर्ण प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. आमदार रमेश बोरनारे यांच्या निकटवर्तीयांनी या प्रकरणाचा भंडाफोड केल्याने गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे.

अर्जदारांना संशयास्पद कॉल येऊ लागले.
राज्यातील मिनी अंगणवाड्यांचा दर्जा सामान्य अंगणवाडीप्रमाणे करण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर, एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत मदतनीसांच्या १२२ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मार्च २०२५ होती. त्यानंतर प्राथमिक यादी पाच दिवसांत प्रसिद्ध करून दहा दिवसांत अंतिम यादी जाहीर होणार आहे. परंतु याच कालावधीत अनेक अर्जदारांना संशयास्पद कॉल येऊ लागले.
कॉलमध्ये पैशांची मागणी केल्याने अर्जदारांमध्ये संतापाचे वातावरण
हॅलो, अंगणवाडी सेविका व्हायचे असेल तर दीड लाख रुपये जमा करा अशा स्वरूपाचे फोन अर्जदारांना येत असल्याचा आरोप आहे. या कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव ईश्वर असल्याचे सांगून तो वैजापूरच्या अधिकाऱ्यांचे काम बघत असल्याचा दावा केला आहे. या कॉलमध्ये पैशांची मागणी केल्याने अर्जदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
तालुक्यात मदतनीसांच्या भरती प्रक्रियेसाठी अनेकांना पैसे मागितल्याच्या तक्रारी आमदार कार्यालयात आल्या होत्या. त्याच अनुषंगाने मी वैजापूर एकात्मिक बाल विकास अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. असे खुलेआम कोणी भरती प्रक्रियेसाठी पैसे मागत असेल, तर कोणीही अशा कॉलला प्रतिसाद देऊ नये आणि आमच्याकडे तक्रार करावी. गुणवत्ता असणाऱ्या महिलांच्या कल्याणासाठी आम्ही तत्पर आहोत.
बाबासाहेब जगताप
मा. सभापती, पं.स. वैजापूर तथा उपजिल्हा प्रमुख, शिवसेना
कॉल करणाऱ्या व्यक्तीचा माझा कुठलाही संबंध नाही. आमच्या विभागात अशा नावाचा कुठलाही कर्मचारी कार्यरत नाही. आमचे नाव सांगून कुठलाही व्यक्ती कॉल करत असेल तर त्यांनी तक्रार करावी. पैशाची मागणी करत असेल तर आमच्याशीही संपर्क साधावा. तसेच संबंधिताविरुद्ध पोलिसांत तक्रार करावी.
संतोष जाधव,
एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, वैजापूर.