कन्नड/सिल्लोड/छञपती संभाजीनगर
सिल्लोड : भराडी येथून भुसार माल
विक्रीसाठी जळगावला घेऊन जाताना कन्नड तालुक्यातील एका व्यापाऱ्याने सिल्लोड बाजार समितीचे बाजार शुल्क व शासन सुपर व्हिजन शुल्कचे पैसे वाचवण्यासाठी बनावट पावती पुस्तक छापून, त्या पावत्यांवर बनावट शिक्के मारून बोगस पावत्या वापरून बाजार समितीची फसवणूक केली.

ही घटना २५ मार्च रोजी रात्री १० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी व्यापाऱ्याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात २६ मार्च रोजी रात्री १०:१९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिल्लोड बाजार समितीचे कर्मचारी विठ्ठल बाळाभाऊ खोमणे, अशोक रामसिंग सरावणे, संतोष लक्ष्मणसिंग गौर, योगेश बाळासाहेब देशमुख हे भुसार माल कुठे जातो, याची तपासणी करून फी वसुलीसाठी फिरत असताना त्यांना एक ट्रक (एम २० बीटी ७२७२) हरभरा घेऊन भराडी येथून जळगावकडे जाताना या कर्मचाऱ्यांनी त्या ट्रकचालकाला पावती घेण्यास सांगितले, असता चालकाने माझ्याकडे तुमची पावती असल्याचे सांगितले.
त्यावरून कर्मचाऱ्यांनी पावती बघितली असता १ हजार ५० रुपयांची बाजार फी वसुलीची बनावट पावती त्यांना दिसली. त्यांनी याची माहिती तत्काळ बाजार समितीचे सचिव व संचालक मंडळाला दिली. २६ मार्च रोजी हा विषय संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला.
त्यात ही पावती बनावट असल्याचे सिद्ध झाल्यानंतर सदर व्यापाऱ्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा ठराव संचालक मंडळाने घेतला. त्यानंतर सिल्लोड बाजार समितीचे सचिव विश्वास पाटील यांनी सिल्लोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी व्यापारी सुखदेव देवराव गाडेकर (रा. मोहरा, ता कन्नड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला