महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धांचे बक्षिस वितरण राजभवनात संपन्न
भगवान महावीर स्वामींचे तत्वज्ञान व विचार हे सर्वकालीन प्रभावी असुन अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय, अचौर्य अनेकांतवाद ही त्यांची तत्वे विश्वशांतीसाठी आज अत्यंत महत्वपूर्ण अशी आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे भगवान महावीरस्वामी 2550 वा निर्वाण कल्याणक महोत्सव समितीच्या वतीने महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांसाठी भगवान महावीरांच्या जीवन चरित्रावर आधारीत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारोहाप्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री ललित गांधी, आमदार चैनसुख संचेती, समितीचे संयोजक हितेंद्र मोता या मान्यवरांच्या उपस्थितीत राजभवन च्या ऐतिहासिक दरबार हॉल मध्ये संपन्न झालेल्या या समारंभास राज्यभरातुन आलेले जैन समाजाचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व नवकार मंत्राच्या पठनाने सुरू झालेल्या कार्यक्रमाचे राज्यपालांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करून उद्घाटन करण्यात आले.
समितीचे संयोजक हितेंद्र मोता यांनी स्पर्धा आयोजनामागचा उद्देश व संकल्पना आपल्या प्रास्ताविकातुन विशद केली.

मंत्री मंगलप्रभात लोढा व आमदार चैनसुख संचेती यांनी भगवान महावीरांच्या विचारांचे महत्व विशद केले. जैन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या स्पर्धेत राज्यभरातील दहा हजाराहून अधिक शाळा व 16 लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याचे सांगुन आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक रक्कमांच्या पुरस्काराद्वारे विद्यार्थ्यांना गौरविण्यात आल्याचे सांगुन एकुण 25 लाख रूपयांचे पुरस्कार वितरीत केल्याची माहीती दिली.

या राज्यव्यापी भव्य आयोजनाच्या यशस्वीतेसाठी निमंत्रित सदस्य संदिप भंडारी यांच्यासह शासकीय जिल्हा समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचबरोबर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी यांचेही मोलाचे सहकार्य मिळाल्यामुळेच हे आयोजन यशस्वी झाल्याचे ललित गांधी यांनी सांगितले
सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होण्यामध्ये नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक, कोल्हापूर जिल्हा द्वितीय क्रमांक व नागपूर जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकावला.
प्रथम क्रमांकाच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्राथमिक विभागातील राज्यातुन प्रथम आलेल्या गुंज निलेश सेठीया 3 लाख 33 हजार 333 रूपये द्वितीय आलेल्या स्वास्ती जिनेश काला हिला 2 लाख 22 हजार 222 रूपये, तृतीय आलेल्या श्रीशा प्रसाद सोनवणे हीला 1 लाख 11 हजार 111 रूपये तसेच माध्यमिक विभागातील राज्यातुन प्रथम आलेल्या वैजापूर तालुक्यातील चाटे स्कूल, लासुर च्या आराध्या पारस लोढा हिला 4 लाख 44 हजार 444 रूपये, अक्षय एकनाथ ढेरे यास 2 लाख 22 हजार 222 रूपये, शर्वरी प्रज्ञान भोजनकर हिला 1 लाख 11 हजार 111 रूपये पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात आले. याव्यतिरीक्त 10 विशिष्ट निबंध, 5 सर्वोत्तम शाळा यांचा राज्यपाल महोदयांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी जैन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, आमदार चैनसुख संचेती, संदिप भंडारी यांच्या हस्ते संभाजीनगर जिल्हा समिती सदस्य निलेश पारख, कमलेश बागरेचा, रवींद्र लोढा, प्रकाश कोचेटा, महावीर पाटणी यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हास्तरावरील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा पारीतोषिक वितरण समारंभ त्या त्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणार असल्याची माहीती ललित गांधी यांनी दिली.