राजकारणात कट्टर परंतु ,तोंडभरून कौतुक
राजकारणात कितीही कट्टर विरोधक असला तरीही त्याच्याविरुद्ध नेहमी ‘गरळच’ ओकली पाहिजे. असं काही नाही. याला काही राजकारणी अपवाद असतात. विरोधकाने चांगल्या कामाचे तोंडभरून कौतुक करणं हे एका सूज्ञ आणि खिलाडूवृत्तीच्या राजकारण्याची लक्षणे असतात.

शेजारी-शेजारी बसले अन चर्चेचा मुद्दा
असाच एक योगायोग वैजापूरकरांना पहावयास मिळाला. दोन राजकारणातील हाडवैरी एका व्यासपीठावर आले अन् सर्वांच्याच भुवया उंचावल्या. केवळ एका व्यासपीठावरच नाही तर एकमेकांच्या शेजारी – शेजारी होते. हा किस्सा आहे शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे आणि ठाकरसेनेचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी या दोघांचा.

राजकारणात कुणीच कुणाचे कायम मिञ अन कायम शञु नाही
राजकारणात कुणीच – कुणाचे कायम मित्र अथवा शत्रू असत नाही. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शिंदे सेनेचे आमदार रमेश बोरनारे व माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी हे दोघेही सध्याच्या राजकारणातील हुकमी ‘एक्के’ आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांचेही राजकारण जवळपास ‘समातंर’ आणि ‘सल्ल्याने’ चालले. असे असले तरी राजकारणात सर्वांनाचा महत्त्वाकांक्षा असते. तसे दोघेही याला अपवाद नाहीत.

मार्ग बदलले अन चिखलफेक झाली
त्यात काही गैरही नाही. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याच्या काही दिवस अगोदरपासूनच दोघांचे मार्ग वेगळे झाले अन् मग सुरू झाली एकमेकांवर चिखलफेक. निवडणुकीच्या धामधुमीत डॉ. परदेशींनी भाजपच्या ‘कमळा’ला सोडचिठ्ठी देऊन ठाकरसेनेची ‘मशाल’ हाती घेतली तर दुसरीकडे आमदार बोरनारेंनी आपला ‘धनुष्यबाण’ हाती ठेवून तेथेच राहिले. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

विधानसभा निवडणुकीत दोघांनीही एकमेकांवर ‘राळ’ उठवित रान पेटविले. यात बोरनारेंनी बाजी मारून मैदान जिंकले. या काळात बहुतांश कार्यक्रमात दोघांनाही एका कार्यक्रमात आणि एकाच व्यासपीठावर अन् तेही शेजारी – शेजारी बसलेले असल्याची पहावयाची संधी कुणालाच मिळाली नाही.

९ फेब्रुवारी रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन सेवेचे लोकार्पण सोहळ्याचे निमित्त होते. या निमित्ताने दोघेही एकाच व्यासपीठावर एकत्र आले अन् हा बातमीचा विषय ठरला. आमदार बोरनारे अगोदरच येऊन व्यासपीठावर येऊन विराजमान झालेले होते. तदनंतर काही मिनिटांनी डाॅ. परदेशींचे व्यासपीठावर आगमन होताच बोरनारेंनी ‘डाॅक्टर या’ असं म्हणून साद घातली. तेवढ्यात तत्परतेने डॉ. परदेशींनीही प्रतिसाद दिला. साद घातली अन् प्रतिसाद मिळाला. असंच काहीसं झालं.
आमदार बोरनारेही सुखावले!

डॉ. परदेशींनी आपल्या भाषणातून ‘आमदारांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन सेवा सुरू झाली. ही बाब खरोखरच कौतुकास्पद म्हणावी लागेल. याबद्दल शासनाचे जाहीर आभार’ असे गौरवोद्गार काढले.

परदेशींची खिलाडू वृत्ती
या गौरवोद्गाराने आमदार नक्कीच सुखावले असतील. यात शंका नाही. राजकारणातील कट्टर विरोधक असूनही त्यांच्याबद्दल असे तोंडभरून कौतुक करण्यासाठी ते काळीज आणि तेवढेच मोठे मनही लागते. डॉ. परदेशींनी बोरनारेंचे कौतुक करण्याची कोणतीही कसर सोडली नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि केलेल्या विकासकामांची कोडकौतुक करून पावती देणं हा भाग वेगळा असतो. हे डॉ. परदेशींसारख्या खिलाडू वृत्तीच्या राजकारण्याने दाखवून दिले.

शेजारी पण, संवाद अबोल
दोघेही एकमेकांशेजारी बसलेले होते. परंतु संवाद ‘अबोल’ होता. दोघांच्या भावमुद्रेवरून मनात काहीतरी ‘शिजतंय’ याची प्रचीती येते. मु्द्रेवरील गहनता, धीरगंभीरता खूप काही सांगून जाते आणि विशेष म्हणजे छायाचित्रात दोघांचीही भावमुद्रा एक आहेच. परंतु चेहऱ्यावर दोघांनी ठेवलेले ‘हात’ ही मुद्राही समसमान यावी. हाही एक योगायोग म्हणावा लागेल.