छत्रपती संभाजीनगर – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक फोडून थेट रस्ता तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे दुभाजक कुणी कशासाठी व का फोडले? हा संशोधनाचा विषय असला तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला या बाबीची भणक देखील नाही. हेही विशेष आहे. शहरातील काही व्यावसायिकांनी कायदा व नियम वेशीवर टांगले असून ‘फोडा आणि राज्य करा’ नीतीचा अवलंब सुरू आहे.

शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर – नाशिक महामार्गावरील करुणा निकेतन शाळेच्या परिसरात असलेले दुभाजक अगोदर जेसीबी यंत्राच्या साह्याने फोडण्यात आले. कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून काही दिवस आहे त्याच परिस्थितीत ठेवण्यात आले.

व्यावसायिक फायद्यासाठी हा प्रताप करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येते. हा अवैध रस्ता तयार केल्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील दुभाजक तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असा सूर वैजापुरकरांत उमटत आहे. साधारणत: तीन वर्षांपूर्वी या महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला होता.

या महामार्गावरुन सुसाट वाहने धावतात. दरम्यान महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकात झाडे लावण्यात आली आहे. या झाडाची देखभाल पालिकेच्यावतीने करण्यात येते. दरम्यान शहरातील करुणा निकेतन शाळेच्या परिसरात व्यावसायिक फायद्यासाठी काही व्यावसायिकांनी रस्त्यांच्या मध्यातील दुभाजक तोडून अवैध रस्ता तयार केला आहे.

त्यामुळे रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणारे वाहन या दुभाजक तोडलेल्या ठिकाणावरून वळण घेणाऱ्या वाहनांमध्ये भीषण अपघात होण्याचा धोका वाढला आहे. या महामार्गावर असा दुभाजक फोडीचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. अशा घटनांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वेळीच आळा घातला नाही तर या महामार्गावर दुभाजक फोडीच्या आणखीनही घटना नाकरता येत नाही. यामुळे भविष्यात अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्वतःच्या फायद्यासाठी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे कितपत योग्य आहे ? दुभाजक फोडले असेल तर कुणाच्या परवानगीने? याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण काय अॅक्शन घेणार का? हे प्रश्न सध्या मात्र अनुत्तरित आहे. दरम्यान शहरातील दुभाजक फोडणाऱ्याविरुद्ध राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्काळ कारवाई करावी. जेणेकरून भविष्यात अशा दुभाजक फोड्यांवर आळा बसेल.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा रस्ता असला तरी तो नगरपालिका क्षेत्रात आहे. त्यामुळे शहरातील रस्ते कोण फोडतं. याकडे पालिका प्रशासनाने देखील लक्ष देणे गरजेचे आहे. ‘कुणीही या आणि दुभाजक फोडून रस्ता तयार करा’. अशीच परिस्थिती शहरात आहे. दूरपर्यंत दुभाजक फोडून रस्ता होत असताना पालिका प्रशासन झोपेत होते काय? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
छत्रपती संभाजीनगर – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक फोडून नियमानुसार रस्ता तयार करता येत नाही. असं कृत्य कुणी केले असेल तर संबंधितांविरुद्ध कारवाई अटळ आहे.
- पी. एन. जाधव, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर