वाशीमच्या जिल्हाधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे बंजारा म्युझियमचे लोकार्पण झाले. त्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या दबावाखाली विकास निधीचा पैसा मिंध्यांच्या कार्यक्रमाला वाटणाऱ्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांकडे केली आहे.
अंबादास दानवे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र दिले आहे. ५ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी मिंधे सरकारने प्रचंड पैसा उघळला होता. वाशीमचे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांनी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे असलेला २ कोटी ७९ लाख रुपयांचा विकास निधी विकास
अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र
कामांवर खर्च न करता त्यातील ८५ लाख ६० हजार रुपये इतका निधी पालकमंत्र्यांच्या दबावाखाली अन्य जिल्ह्यातील विविध ३३ तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना पोहरादेवीतील मोदींच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या दिला, असे दानवे यांनी या पत्रात नमूद केले आहे. ही बाब गंभीर असून शासनाच्या विकास निधीचा अपव्यय करून जिल्हाधिकारी यांनी कार्यकक्षा ओलांडत पालकमंत्र्यांना गर्दी जमविण्यासाठी मदत केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांनी या कार्यक्रमासाठी नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील एसटीच्या व्यवस्थापकांकडे १८५० गाड्यांची मागणी केली होती. इतक्या गाड्या एकाच दिवशी एकाच कार्यक्रमासाठी लावल्या गेल्याने सामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला, असेही दानवे यांनी या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.