एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या नेत्यांमध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त काहीसे आनंदाचे वातावरण दिसून आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आज प्रथमच शासकीय ध्वजवंदन करण्यात आले.
कार्यक्रमास शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire), विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय मंडळी उपस्थित होती. गेल्या दोन वर्षांपासून संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे यांनी एकमेकांवर टीका केली. एवढेच नाही तर खैरे यांनी संदिपान भुमरे पालकमंत्री असताना शासकीय ध्वजवंदन समारंभात त्यांच्या भाषणावर बहिष्कार टाकत व्यासपीठ सोडल्याचेही दिसून आले होते.

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर मात्र खैरे यांनी असा कोणताही बहिष्कार न टाकता त्यांच्याशी हस्तांदोलन केले. काही मिनिटांच्याच या भेटीने अनेकांच्या भूवया उंचावल्या गेल्या. काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. संजय शिरसाट जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक माजी नगरसेवक येत्या काही दिवसांत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफुस सुरू आहे. मात्र, राजकीय वैर आणि मतभेद बाजूला सारत पालकमंत्री संजय शिरसाट आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे एकमेकांना भेटले आणि हस्तांदोलनही केले. अंबादास दानवे यांनीही काही क्षणांसाठी का होईना शिरसाट यांच्याशी संवाद साधला.
पक्षाला गळती लागलेली असताना एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या या नेत्यांमधील ही काही क्षणांची हातमिळवणी दोन्ही शिवसेनेचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना सुखावणारी होती.