माजी, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधील खासदार प्रताप चिखलीकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर काही महिन्यांपुरते एकत्र आले होते. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत लोहा मतदारसंघातून उमेदवारी मिळवली होती.

त्यानंतर येथील निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर आता या दोघांमध्ये नांदेड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपापल्या पक्षांमध्ये दाखल करुन घेण्यावरून रस्सीखेच सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर प्रताप चिखलीकर (Pratap Chikhlikar) यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी लोहा-कंधार मतदारसंघातून तयारी सुरु केली होती.

ऐनवेळी ही जागा अजित पवार गटाला सुटल्याने चिखलीकर यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला होता. या पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर गेल्या काही आठवड्यांपासून त्यांनी भाजप फोडण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे चिखलीकराना शह देण्यासाठी अशोक चव्हाण यांनी काही जणांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे.

लोहा-कंधार भागातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल करुन घेण्यासाठी चिखलीकर सक्रिय झाले आहेत. भाजपाचे (Bjp) माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माधव पावडे, भाजपाचे तरुण नेते शिवराज पाटील होटाळकर व त्यांच्या अनेक समर्थकांनी गुरुवारी मुंबईला जाऊन ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला. होटाळकर यांनी भाजपच्या स्थानिक आमदारांसोबत काम करणे शक्य नसल्यामुळे आपण पुन्हा स्वगृही’ परतल्याचे स्पष्ट केले.
चिखलीकरांच्या कन्या भाजपमध्येच
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करुन चव्हाण व चिखलीकर कार्यरत झाल्याचे मानले जात आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला असला तरी त्यांच्या कन्या प्रणिता देवरे-चिखलीकर या मात्र अद्यापही भाजपमध्ये आहेत.
खासदार चव्हाण यांना नेता मानणारे लोहा न. प. चे माजी नगराध्यक्ष कल्याण सूर्यवंशी यांनीही अलीकडे चिखलीकरांमार्फत ‘राष्ट्रवादी’ त प्रवेश केला. शेकापचे एकेकाळचे प्रमुख नेते, दिवंगत केशवराव धोंडगे यांचे पुत्र अॅड. मुक्तेश्वर धोंडगे यांनीही ‘राष्ट्रवादी’ त प्रवेश केला आहे. मागील काही दिवसांपासून चिखलीकरांच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी’ त केला.
त्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी ‘राष्ट्रवादी’चे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचे बंधू डॉ. सुनील धोंडगे आणि माजी जि. प. सदस्य विजय धोंडगे यांचा भाजपामध्ये प्रवेश घडवून आणला. त्याआधी चव्हाण यांनी काँग्रेसच्या दोन तालुकाध्यक्षांसह अन्य कार्यकर्त्याना आपल्या पक्षात दाखल करून घेतले होते. जिल्ह्यात काँग्रेससह इतर पक्षांना उतरती कळा लागत असताना, महायुतीत असलेल्या दोन पक्षांच्या दोन नेत्यांत मात्र पक्ष विस्ताराची स्पर्धा लागल्याचे दिसत आहे.