शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी शाळेसमोर उभ्या असलेल्या
इयत्ता नववीतील एका विद्यार्थिनीला अज्ञात व्यक्तीने वडिलांची ओळख सांगून घरी सोडतो म्हणून दुचाकीवर बसण्याचा अग्रह केला.
मात्र, सदर विद्यार्थिनीला शंका आल्याने तिने त्याच्यावर प्रतिप्रश्नांचा मारा करून शाळेत धाव घेतली. यानंतर सदर दुचाकीस्वार पसार झाला.
ही घटना बिडकीन येथील सरस्वती भुवन शाळेत घडली. समयसूचकतेमुळे मुलीने अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तोंडोळी येथील एक १४ वर्षीय मुलगी बिडकीन येथील सरस्वती भुवन शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. शुक्रवारी (दि.७) दुपारी साडेबारा
वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर सदर विद्यार्थिनी ही घरी जाण्यासाठी शाळेच्या गेटसमोर थांबली होती.
तेवढ्यात एक अज्ञात दुचाकीस्वार तिच्यासमोर उभा ठाकला. त्याने तिच्या वडिलांची ओळख सांगून तिला गाडीवर बसण्यास सांगितले.
यावेळी समाजात घडणाऱ्या विविध घटनांमुळे सजग असलेल्या विद्यार्थिनीने समयसूचकता दाखवून सदर अज्ञात व्यक्तीला प्रतिप्रश्न केले. ‘माझ्या पप्पाला फोन करा आणि माझे बोलणे करून द्या’ असे तिने म्हटल्यानंतर त्या अज्ञाताने माझ्या मोबाइलमध्ये बॅलन्स नसल्याचे सांगितले.

त्यामुळे शंका आल्याने सदर मुलीने शाळेत धाव घेतली. मात्र, तेथे शिक्षक दिसले नाहीत, तेव्हा तिने परत गेटसमोर येऊन बघितले असता, सदर व्यक्ती दुचाकीसह पसार झाल्याचे तिला दिसले. तिने घरी गेल्यानंतर ही बाब वडिलांना सांगितली. त्यांनी तत्काळ बिडकीन पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
विद्यार्थिनीची समयसूचकता शाळेसमोर नाहीत सीसीटीव्ही कॅमेरे बिडकीनच्या सरस्वती भुवन शाळेसमोर ही घटना घडली आहे. मात्र, शाळेच्या गेटसमोर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे समोर आले आहे, तसेच शाळेत असलेले अनेक कॅमेरेही बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेरे असते, तर आरोपी पकडण्यात पोलिसांना यश मिळाले असते. पोलिस घटनेचा तपास करीत असून, गावातील इतर सीसीटीव्हींची पडताळणी करीत आहेत. या घटनेनंतर पालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी शाळेकडे केली आहे.
विद्यार्थिनीचा शाळेत सत्कार
सदर विद्यार्थिनीने समजूतदारपणा व समयसूचकतेमुळे अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडल्याने तिचे गाव परिसरात कौतुक होत आहे.
यामुळे शाळेत शनिवारी (दि.८) सकाळी तिचा विद्यार्थी व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. गावातील ग्रामस्थांनीही याप्रसंगी तिचे कौतुक केले.