सॉफ्टवेअर इंजिनिअर असूनही शेतीत उल्लेखनीय यश – दिपक हारदे यांचा ह.भ. प. संजय महाराज जगताप भऊरकर यांच्या हस्ते सन्मान
वैजापूर तालुक्यातील सिद्धापूर येथील दिपक हरिचंद्र हारदे यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, आपल्या मेहनतीच्या जोरावर शेती क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असूनही त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत शेती व्यवस्थापनात अमूलाग्र बदल घडवला आणि नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी केले. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत त्यांना “बिंदास युवा शेतकरी पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन ह.भ.प. संजय महाराज जगताप भऊरकर यांनी दिपक हारदे यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ भेट देत सन्मान केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बिंदास मिडियाचे प्रवीण पाटील, आई वडील मित्रमंडळी उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीत प्रगती
दिपक हारदे यांनी शेतीत आधुनिक सिंचन पद्धती, टोकण यंत्राने सोयाबीन लागवड, मल्चिंग तंत्रज्ञान, करार शेती, आणि थेट ग्राहक विक्री प्रणालीचा अवलंब करून उत्पन्नात मोठी वाढ केली. त्यांनी फळबागेमधे एनएमके गोल्डन सिताफळ आणि तैवान पेरू लागवडीसह मल्चिंगवर कांदा उत्पादन वाढवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.

तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण
TCS सारख्या नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर पदावर कार्यरत असतानाही दिपक हारदे यांनी शेतीला नवे वळण दिले. तालुका कृषी अधिकारी आढाव साहेबांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या शेतीतील प्रयोगांचे कौतुक केले. नोकरी आणि शेती यांचा उत्तम समन्वय साधत वयाच्या पंचिवस व्या वर्षी त्यांनी तालुक्यातील तरुणांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
सन्मानप्रसंगी दीपक हरदे यांनी संजय महाराज जगताप यांचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि मित्रमंडळींना दिले. ते म्हणाले, “हा पुरस्कार केवळ माझ्यासाठी नाही, तर माझ्यासोबत अविरत कष्ट करणाऱ्या माझ्या आई-वडिलांसाठी आणि मला साथ देणाऱ्या मित्रपरिवारासाठीही आहे. त्यांच्या मदतीमुळेच मी हे यश संपादन करू शकलो.”
दिपक हारदे ( बिंदास युवा शेतकरी )
“बिंदास युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त दिपक हारदे यांचा त्यांच्या निवासस्थानी संजय महाराज जगताप यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान, सोबत बिंदास परिवाराचे प्रवीण पाटील.”