छञपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पाहणी करण्यासाठी पथक येणार असल्याची चर्चा आहे. कधी नव्हे ते पालिका प्रशासन आता ‘अलर्ट मोड’वर आले आहेत.
आता हे पथक येणार असल्यामुळे प्रशासकांनी जवळपास वीस-पंचविस कर्मचाऱ्यांचा ताफा तयार केला आहे.
‘करावेच लागेल’ अन झालेच पाहीजे
इतकेच नाही तर सक्तीने त्यांना ‘करावेच लागेल’ अन झालेच पाहीजे असा आदेशही दिला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठीकाणी साचलेले कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांची आता सारवासारव सुरू झाली आहे.
मोक्याची ठिकाणे ‘चकाचक’ करण्याचा सपाटा
शहरातील मोक्याची ठिकाणे ‘चकाचक’ करण्याचा सपाटा पालिकेने लावला आहे. परंतु असे असले तरी या पथकाने यदाकदाचित शहरातील दुर्लक्षित ठिकाणांची पाहणी केल्यास पालिकेचा ‘भांडाफोड’ झाल्याशिवाय राहणार नाही.

भूमिगत गटारी ‘ओव्हरफ्लो’
साधारणतः सहा महिन्यांपासून शहरात नागरी सुविधांसह स्वच्छतेचे ‘धिंडवडे’ निघाले असताना पालिका प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. भूमिगत गटारी ‘ओव्हरफ्लो’ होऊन सांडपाणी नागरिकांच्या घरांच्या दर्शनी भागात साचत आहे. याशिवाय खुल्या गटारींची महिनोन्महिने साफसफाई नाही.

डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतीही फवारणी केली नाही
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतीही फवारणी केली नाही. शहराच्या चोहोबाजूंनी साचलेले कचऱ्यांचे ढिगारे, मोकाट जनावरांसह कुत्र्यांचा सुळसुळाट, अस्वच्छ पाणीपुरवठा, कचरा संकलनासाठी नियुक्त केलेल्या घंटागाड्या जागेवरच थांबून आहे. पालिकेतर्गंत असलेल्या रस्त्यांना दुतर्फा गवतांसह बाभळींनी वेढले आहे.
नागरिकांना ‘शब्दबंबाळ’ होऊन परतण्याची वेळ
या समस्या पालिकेत घेऊन गेल्यास पालिका अधिकाऱ्यांकडून नागरिकांना ‘शब्दबंबाळ’ होऊन परतण्याची वेळ येते. अशा असंख्य समस्यांचे ‘ओझे’ घेऊन पालिका स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झाली आहे. केवळ स्वच्छ सर्वेक्षण पथक येणार म्हणून गेल्या काही दिवसांपासून पालिका प्रशासनाची ‘लगीनघाई’ सुरू आहे.
पालिकेला नागरिकांचा अचानक कळवळा
एरवी नागरी समस्या व सुविधांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या पालिका प्रशासनाने आता शहरातील कचऱ्याचे ढिगारे उचलण्यासह रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गवताची साफसफाई सुरू केली आहे. या सुरू असलेल्या साफसफाईवरून पालिकेला नागरिकांचा अचानक कळवळा कसा आला?
‘पुरस्कार’ पटकाविण्यासाठी खटाटोप
अचानक समस्या निराकरण होण्याचे कारण काय? उशिरा सुचलेले शहाणपण म्हणायचे की केवळ ‘पुरस्कार’ पटकाविण्यासाठी सुरू केलेला हा खटाटोप म्हणायचा? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांना आपसूकच पडू लागले आहेत. स्वच्छतेसह नागरी समस्यांचा निपटारा होत असेल तर नक्कीच ही ‘स्वागतार्ह’ बाब आहे.
एवढी ‘बोंबाबोंब’ झालीच नसती.
परंतु पालिकेला झालेला अचानक ‘साक्षात्कार’ नागरिकांसाठी आश्चर्याचा धक्का मानला जात आहे. पालिकेने याबाबत यापूर्वीच सातत्य ठेवले असते तर एवढी ‘बोंबाबोंब’ झालीच नसती. परंतु अधिकाऱ्यांच्या अरेरावी व बेधडक ‘संगीत’नाट्यामुळे त्या वैजापूरकरांच्या रोषाच्या ‘धनी’ ठरल्या आहेत.
‘खाबुगिरी’चा हव्यास
मालमत्ता कर असो की, अन्य कर वसुलीसाठी सामान्यांना ‘सळो की पळो’ करून सोडणाऱ्या पालिकेला मात्र माहावितरणच्या कोट्यवधी रुपयांचे थकित देयकाचा विसर पडला आहे. पालिकेतही नेहमीच ‘फौजदारा’च्या भूमिकेत वावणाऱ्या अधिकाऱ्याचे अन्य कर्मचाऱ्यांशी फारसे ‘सख्य’ नाही. ‘खाबुगिरी’चा हव्यास स्वस्थ बसू देत नसल्याने याबाबतही आनंदी-आनंद आहे.
हेही तितकेच खरे!
मोजक्याच बगलबच्चांसोबत ‘मधूर’ संबध ठेवून पालिकेचा डोलारा सांभाळणाऱ्यांच्या अशा अनेक ‘सुरस’ कथा आहेत. पथकाने केवळ तात्पुरत्या स्वच्छतेवर न ‘भाळता’ पालिकेच्या कारभाराची माहिती घेऊन मिळालेल्या ‘पुरक’ माहितीच्या आधारे गुणांकन केल्यास पालिका ‘नापास’ होईल. यात तिळमात्रही शंका नाही. परंतु तसे न होता पालिका ‘पास’ झालीच तर पथकातील अधिकाऱ्यांचीही यातून ‘गुणवत्ता’ दिसून येईल. हेही तितकेच खरे!
सर जरा ‘इधर भी देखाे’
स्वच्छ सर्वेक्षण पथकाने शहरातील विविध भागांचा दौरा केल्यास पालिकेचे ‘बिंग’ फुटल्याशिवाय राहणार नाही. शहरातील खानगल्ली, बर्डी मशीद, गंगापूर रस्ता, नवीन भाजीमंडई, जुनी भाजीमंडई, इंदिरानगर , नारंगी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या नागरी वसाहतींसह,म्हस्की रस्त्याच्या कडेला, अन्य बहुतांश भागांची पाहणी केल्यास ‘दूध का दूध और पानी का पानी’ होईल. हे ही तितुकेच खरे आहे.