दीड वर्षानंतर झांबड पोलिसांना शरण
छत्रपती संभाजीनगर, अजिंठा अर्बन बँकेत ९७. ४१ कोटींचा घोटाळा केल्यानंतर दीड वर्षापासून फरार असलेले काँग्रेसचे माजी आमदार तथा बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांनी अखेर आर्थिक गुन्हे शाखेसमोर शुक्रवारी (दि.७) शरणागती पत्करली.
झांबड यांना न्यायालयात हजर केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. बी. तोष णीवाल यांनी १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. झांबड यांचा सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व फेटाळल्याने त्यांचे सर्व मार्ग बंद झाले होते. यावेळी न्यायालयात झांबड समर्थकांसह अनेक ठेवीदारांनी न्यायालयात मोठी गर्दी केली होती.

अजिंठा अर्बन बँकेत घोटाळा समोर २८ ऑगस्ट २०२३ रोजी आरबीआयने आर्थिक निर्बंध आणले. प्रशासक म्हणून ३१ ऑगस्ट रोजी फिर्यादी सुरेश पंडितराव काकडे (५३. रा.सातारा परिसर) यांची नियुक्ती झाली. बँकेत स्वनिधीत ७०.१४ कोटी तर सीआरए आरमध्ये ३८.३० कोटींचा फरक समोर आला. तसेच, ३६ खातेधारकांना खोट्या मुदतठेवी व तारण दाखवून ६४.६० कोटींचे असुरक्षित कर्ज वाटप केले गेले. ही बाब २३ डिसेंबर २०२२ रोजी बँकेने रिझर्व्ह बँकेला
दिलेल्या पत्रात मान्य केली. ३१ मार्च २०२३ रोजी बँकेने ३२.८१ कोटी रुपये एसबीआय, एक्सिस आणि एमएससी बँकेत खोटे व बनावट बँक बाकी प्रमाणपत्र सीएकडे सादर केले होते. त्यावरून सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल झाला. डिसेंबर २०२४ मध्ये सुमारे २१ कोटी ५६ लाख ११ हजार ५६५ रुपयांचा एफडी घोटाळा उघड झाला. २००६ ते २०२३ या काळात अनेक एफडीधारकांचे पैसे परस्पर काढून त्यातून ३६ एफडी अगेन्स्ट लोनची परतफेड करून अपहार केला. या प्रकरणी अध्यक्ष सुभाष झांबड यांच्यासह ६८ आरोपींविरुद्ध सिटी चौक ठाण्यात दुसरा गुन्हा झाला.
अजिंठा अर्बन बँक ४१५ कोटींची ठेवी
बँकेत ४१५ कोटींच्या ठेवी आहेत. घोटाळा होताच झांबड यांनी रोख आणि आरटीजीसद्वारे ४५ कोटी रुपये भरले होते. आरबीआयने पहिल्या टप्यात पाच लाख प्रमाणे १९४ कोटी आणि दुसऱ्यांदा ८४ कोटींची मुदतठेवमधील रक्कम नागरिकांना वाटप केली. १३७ कोटी रुपये देणे बाकी आहे. त्यात बँकेत सध्या ९० कोटी पडून असले तरी त्यावर आरबीआयचे निर्बंध आहेत.

आतापर्यंत ३९ पैकी १३ आरोपींना अटक
पहिल्या गुन्ह्यात संचालक वगळता सीईओ, व्यवस्थापक आणि पैसे ज्याच्या खात्यावर गेले अशा १३ जणांना अटक केली होती. ते सर्वजण जामिनावर बाहेर आहे. पोलिसांनी यांच्याविरुद्ध न्यायालयात सप्टेंबर २०२३ मध्येच दोषारोपपत्र दाखल केले आहे. उर्वरित २६ आरोपीचा सहभाग तपासून त्यांनाही अटक होणार आहे.
सुरत, पुण्यात वास्तव्य; कुंभमेळ्यात स्नान
सुभाष झांबड गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाले. राजकीय वलय असल्याने त्यांना अटक करणे पोलिसांना चांगलेच जड गेले. त्यांनी पुणे आणि गुजरातच्या सुरत येथे दीड वर्ष काढले. अधूनमधून ते शहरातही येऊन गेले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने त्यांचे मार्ग बंद झाले होते. त्यांनी प्रयागराज येथे कुंभमेळात स्नान करून दर्शन घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, ते शहरात आल्याची माहिती मिळताच शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मोहसीन सय्यद, अंमलदार अभिजित गायकवाड यांच्या पथकाने सिडको एन-२ येथील बंगल्यावर जाऊन त्यांना ताब्यात घेतले.
या मुद्यांवर होणार तपास
बनावट एफडींच्या ३६ फाईलींपैकी ३१ फाईल जात असून ५ कर्ज फाईल हस्तगत करणे आहे. त्या ३६ कर्जदारांपैकी ६ कर्जदारांचे नाव निष्पन्न झाले असून ३० कर्जदारांची नावे निष्पन्न करून अटक करणे आहे. त्या ३६ एफडींची अगेन्स्ट कर्जाची रक्कम झांबडच्या सोहम मोटार्स व झांबड कंन्स्ट्रक्शन बैंक खात्यावर जमा झाली. तेथून रक्कम विड्रॉल करण्यात आली. त्या रकमेचा उपयोग कोठे केला, याचा तपास करणे आहे.
बनावट बँक बॅलेन्स प्रमाणपत्रावर त्या बँकांचे शिक्के कोणी व कोठे तयार केले याचा तपास बाकी आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच दोन्ही फर्मची बँक खाती गोठवली असून त्यात सुमारे १० कोटींची रक्कम असल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.