भरधाव पिकअपच्या धडकेत शाळकरी मुलगी जागीच ठार झाल्याची घटना ०८ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. श्रेया हरिश्चंद्र दुसाने (१५) असे घटनेतील मृत मुलीचे नाव आहे. श्रेयाच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, श्रेया दुसाने ही वैजापूर येथील आनंदनगर परिसरात कुटूंबियांसह रहिवासास होती. ती शहरातील सेंट मोनिका शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दरम्यान बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ती सायकलवर शिकवणीला जात होती. घरून निघाल्यानंतर ती म्हसोबा चौकात पोहचली.
त्याठिकाणी रस्ता पार करताना शहराच्या दिशेने येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने तिला जोराची धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली. त्याच अवस्थेत तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. वैजापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली होती.