सामूहिक कॉपी : शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव तयार
छत्रपती संभाजीनगर, :
सामूहिक कॉपीप्रकरणी पिंपळगाव वळण येथील आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाची शासन मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाने तयार केला असून गुरुवारी तो उपसंचालक कार्यालयात सादर केला जाणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांनी दिली.

बारावीच्या परीक्षेदरम्यान फुलंब्री तालुक्यातील आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर २१ फेब्रुवारी रोजी गणित विषयाच्या पेप रला सामूहिक कॉपी सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना यांच्या पाहणीत समोर आले होते.
परीक्षा केंद्रावर ११ पर्यवेक्षक खासगी कोचिंग क्लासचे असल्याची बाबही समोर आली होती. सीईओ मीना यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी सोमवारी दुपारी शाळेस भेट देऊन कागदपत्रांची तपासणी केली.
त्यात जे पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले होते, ते संबंधित शाळेत कार्यरतच नसल्याचे आढळून आले. या सर्व प्रकरानंतर शिक्षण विभागाने आदर्श विद्यालयाच्या केंद्र प्रमुखासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तसेच आता या प्रकरणात आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाची शासन मान्यता रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.