शिवसेना ठाकरे गट अर्थसंकल्पीय अधिवेशनात करणार दावा
राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर हिवाळी अधिवेशनात दावा न करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाने आता येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात या पदावर दावा करण्याचे ठरविले असून या पदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.

गेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला मिळण्याबाबत चर्चा केली होती.
विधान परिषदेत सतेज पाटील विरोधी पक्षनेते
मात्र विधान परिषदेत सतेज पाटील विरोधी पक्षनेते ? काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात झालेल्या तडजोडीनुसार विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेना ठाकरे गटाला तर विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार आहे.

यामुळे विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या जागी काँग्रेसच्या सतेज पाटील यांना संधी मिळेल, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
शिवसेना ठाकरे गटातर्फे या पदावर दावा
प्रत्यक्ष शिवसेना ठाकरे गटातर्फे या पदावर दावा करण्यात आला नाही. शिवसेनेत विधिमंडळ गटनेते भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांच्या नावांची विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चा सुरू झाली. पण ती मध्येच थांबली.
भास्कर जाधवांसारख्या आक्रमक नेत्याऐवजी आदित्य ठाकरेंच्या
नावाचा प्रस्ताव विरोधी पक्ष नेता पदासाठी प्राप्त झाल्यास त्याला सरकारतर्फे संमती दिली जाईल, असा संदेश भाजपतर्फे ठाकरे गटाला देण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
भाजप आणि सरकारला नाव पसंत नसेल तर १० टक्क्यांपेक्षा कमी आमदार असल्याचे कारण सांगून
सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला नाकारूही शकते, ही टांगती तलवार ठाकरे गटावर आहे.
आदित्य यांना संधी दिल्यास कुणी नाराज झाले, कुणाला पक्ष सोडून जायचे असेल तर जाऊ द्या, भविष्यात पक्षाचे नेतृत्व आदित्य यांनाच करायचे आहे, असे अलीकडेच उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत सांगितल्याचे कळते.
त्यामुळे ३ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशन काळात या पदासाठी आदित्य यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र पक्षातर्फे देण्यात येणार आहे.