लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यातील सत्ताधारी महायुतीला आस्मान दाखवले. पण विधानसभा निवडणुकीत आघाडी जमीनीवर आली.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मराठवाड्यातील लढवलेल्या चार पैकी तीन जागा जिंकत चांगला स्ट्राईक रेट ठेवला. धाराशीव, हिंगोली आणि परभणी या तीन जागा उद्धव ठाकरेंनी जिंकल्या पण पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरमध्ये सलग दोन वेळा शिवसेनेला पराभवाचे तोंड पहावे लागले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दारुण झालेल्या पराभवाचे साईड इफेक्ट दिसायला सुरूवात झाली आहे. शिवसेनेने ज्यांना महापौर, नगरसेवक, आमदार केले ते आज पक्ष सोडून सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. ही संख्या इतकी वेगाने वाढते आहे, की पक्ष रिकामा होतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात थोड्या फार प्रमाणात हेच चित्र असले मराठवाड्याच्या बालेकिल्ल्यात होत असलेली वाताहात वेदनादायक आहे.

संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि काही बोटावर मोजण्या इतके पदाधिकारीच आता शिवसेना (Uddhav Thackeray) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहेत. पक्षातून लोक जात असताना जे होते ते बऱ्यासाठीच, आता तरी नव्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संधी मिळेल, असा एक मतप्रवाह पक्षात आहे. परंतु महापालिका, जिल्हा परिषदेसारख्या महत्वाच्या निवडणुका पाहता पक्षाला लागलेली गळती चांगली कशी म्हणणार.

परभणी जिल्हा शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत महत्वाचा समजला जातो. या जिल्ह्यानेच पक्षाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवून दिले होते. लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघाने पक्ष फुटीनंतरही उद्धव ठाकरेंच्या पक्षाची साथ दिली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही परभणीतून राहुल पाटील हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. लोकसभा आणि विधानसभेची जागा राखल्यानंतरही जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे वर्चस्व कमी होताना दिसते आहे.