फडणवीसांकडे पाहूनच ‘घड्याळ, बाणा’ला मतं
परंड्यातील कार्यक्रमांत सुरेश धस यांचे वक्तव्य
धाराशिव
विधानसभेच्या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघूनच जनतेने ‘धनुष्यबाण व घड्याळा’ला मतं दिल्याचे मोठं वक्तव्य भाजपा आमदार सुरेश धस यांनी रविवारी परंड्यातील एका सत्कार सोहळ्यात केले.

आमदार धस म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राजकारणातील आश्वासक चेहरा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनतेने पसंती दिली. त्यामुळेच महायुतीने कधी नव्हे त्या २८८ पैकी २३४ जागा जिंकल्या.

एकनाथ शिंदे यांचा ‘धनुष्यबाण’ व अजीत पवार यांच्या ‘घड्याळा’ मतदान केलं
फडणवीस यांच्याकडे पाहूनच लोकांनी एकनाथ शिंदे यांचा ‘धनुष्यबाण’ व अजीत पवार यांच्या ‘घड्याळा’ मतदान केलं. नाही तर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘घड्याळा’ला कधी मतं दिली असती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बाणाची आणि आमची खूप जुनी मैत्री आहे.

त्यामुळे आमच्या लोकांनी नेहमीप्रमाणे ‘बाणा’ला मतदान केल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात आजघडीला कार्यकर्त्यांना सांभाळणारा नेता म्हटलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर येतं, अशा शब्दात आ. धस यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

आमदार धसांनी नाकारला सत्कार
प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेले आमदार धस यांनी या सोहळ्यात सत्कार नाकारला. जोपर्यंत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, तोवर सत्कार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी आयोजकांकडे मांडली. त्यांच्या या भूमिकेनंतर मंचावरील इतर मान्यवरांनीही सत्कार स्वीकारला नाही.
‘त्यांना’ही स्वतंत्र मोकोका लागावा…
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना पळून जाण्यासाठी वाशी पोलीस ठाण्यातील काहींनी मदत केली आहे. संबंधितांना आरोपी करून त्यांच्याविरूद्ध स्वतंत्र मोकोका लावावा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना केली.